बीजिंग : लष्करी मालवाहू विमानाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवल्याच्या वृत्ताचे चीनने सोमवारी खंडन केले. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरवणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. सोमवारी चीनच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांच्या शियान वाय-२० लष्करी वाहतूक विमानाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा दावा खोडून काढला आहे. वाय-२० विमानाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पोहचविल्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहेत. ही छायाचित्रे खोटी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. लष्कराशी संबंधित अफवा पसरवणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालानुसार, चीन पाकिस्तानला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. २०२० ते २०२४ पर्यंत पाकिस्तानने केलेल्या शस्त्रास्त्र खरेदीपैकी ८१ टक्के शस्त्रे चीनकडून खरेदी करण्यात आली. या खरेदीमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने, रडार, नौदल जहाजे, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
Fans
Followers